Blogमहाराष्ट्रातील मंदीरे

अष्टविनायक गणपती | Ashtavinayak Ganpati Locations Information in Marathi

अष्टविनायक हे महाराष्ट्रातील स्थित आठ गणपती मंदिरांचा एक समूह आहे. या मंदिरांच्या समूहाला भेट देण्याची यात्रा अष्टविनायक यात्रा म्हणून ओळखली जाते. अष्टविनायकाची ही ८ मंदिरे महाराष्ट्राच्या पश्चिम भागात वेगवेगळ्या ठिकाणी स्थित आहेत. हे सर्व मंदिरे प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत तसेच सर्व गणपती ‘स्वयंभू’ म्हणजेच स्वयंउत्पन्न मानली जातात.

प्रत्येक अष्टविनायक गणपतींना वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते आणि प्रत्येक गणपतीची वेगळी कथा आहे.  हि सर्व ठिकाणे “जागृत देवस्थानं” मानली जातात म्हणजेच ते सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. अष्टविनायक मंदिरांचा समूह हा गणपतीच्या आठ अवतारांना समर्पित आहे. या अवतारांची माहिती खालीलप्रमाणे आहेत:

अष्टविनायकांची नावे आणि ठिकाणे | Ashtavinayak Ganpati Location List

ही आठ मंदिरे महाराष्ट्रातील पुणे, रायगड आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांमध्ये वसलेली आहेत.

  1. मोरेश्वर मंदिर, मोरगाव
  2. सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेक
  3. बल्लाळेश्वर मंदिर, पाली
  4. वरदविनायक मंदिर, महाड
  5. चिंतामणी मंदिर, थेऊर
  6. गिरिजात्मज मंदिर, लेण्याद्री
  7. विघ्नहर मंदिर, ओझर
  8. महागणपती मंदिर, रांजणगाव

चला तर मग या अष्टविनायक मंदिरांची माहिती पाहू या –

मोरेश्वर मंदिर, मोरगाव

मोरगाव येथील मोरेश्वर मंदिर हे अष्टविनायक मंदिरांपैकी सर्वात प्राचीन मंदिर आहे.  पुण्यापासून मोरगाव ६८ किलोमीटर (सासवड-जेजुरी मार्गे)अंतरावर आहे. मंदिर चांगल्या रस्त्याने जोडले असल्यामुळे प्रवास सुखकर होतो. अष्टविनायकयात्रेला सर्वप्रथम मोरेश्वर मंदिरापासूनच सुरुवात होते. हे मंदिर 11 व्या शतकात बांधले गेले असल्याचे मानले जाते. मंदिरातील गणपतीची मूर्ती स्वयंभू मानली जाते, याचा अर्थ ही मूर्ती कोणीही बनवली नसून स्वयं प्रगत झाल्याचे मानले जाते. ही मूर्ती काळ्या पाषाणाची आहे आणि तिची उंची सुमारे 3 फूट आहे.  तसेच गणपतीची सोंड डावीकडे वळलेली असून गणपतीच्या डोळ्यात आणि नाभीत हिरे जडवले आहे.  यामुर्तीवर नागाचे संरक्षक छत्र आहे. जश्या प्रत्येक गणपती मंदिरात रिद्धी आणि सिद्धी यांच्या प्रतिमा असतात त्याप्रमाणे इथेही त्यांच्या मूर्ती आहेत. तसेच मंदिर अतिशय सुंदर आणि 50 फूट उंच आहे.

मंदिराला चारही दिशांनी चार प्रवेशद्वारे आहेत, परंतु मुख्य प्रवेशद्वार हे उत्तराभिमुख आहे.  मंदिराच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर चारही युगातील त्या-त्या गणपतीच्या अवताराचे चित्र आहे. मंदिराच्या अंगणात दोन भव्य दीपमाळा आहेत आपण त्याला दिव्याचे बुरुज असेही म्हणतो. तसेच मंदिरात गणपतीकडे तोंड करून बसलेल्या विशालकाय नंदीच्या शिल्पाचे दर्शन होते व जवळपास ६ फूट उंचीचा एक उंदीर आहे. आपण प्रत्येक शिवमंदिरांमध्ये नंदी बघतो पण गणपतीसमोर नंदी असणारे हे एकमेव मंदिर आहे.

रोज सकाळी 7 वा., दुपारी 12 वा.आणि रात्री 8 वा. अशी दिवसातून तीन वेळा गणपतीची पूजा-आरती केली जाते. गणेश जयंती आणि गणेश चतुर्थी तेथे मोठी गर्दी  असते. गणेश चतुर्थीचा मुहूर्त जवळपास महिनाभर सुरु असतो. विजया दशमी, सोमवती अमावस्या शुक्ल चतुर्थी, कृष्ण चतुर्थी असे सर्व उत्सव अत्यंत आनंदाने जत्रांचे आयोजन करून साजरे केले जातात.

मोरगाव मंदिर हे एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र आहे आणि दरवर्षी लाखो लोक या मंदिराला भेट देतात. मंदिरात दररोज दर्शनासाठी खूप गर्दी असते.

सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेक

अष्टविनायकांमधील सिद्धिविनायक मंदिर हे अनुक्रमे दुसरे गणेश मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये सिद्धटेक गावात स्थित आहे. पुण्यापासून १६० किलोमीटर अंतरावर भीमा नदीकाठी हे मंदिर आहे. देव सिद्धिविनायक आपल्या भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात म्हणून त्याला सिद्धिविनायक म्हणतात असे मानले जाते. तसेच सिद्धटेकला भगवान विष्णूंनी विशेष शक्ती (सिद्धि) प्राप्त केली होती. याच ठिकाणी सिद्धटेक टेकडीवर सिद्धिविनायक मंदिर आहे. अष्टविनायकांपैकी हि एकमेव मूर्ती आहे कि ज्या मूर्तीची सोंड उजव्या बाजूने आहे. सिद्धिविनायक मूर्ती स्वयंभू असून सुमारे ३ फूट उंची आहे आणि अडीच फूट रुंद आहे. नेहमीप्रमाणे रिद्धि आणि सिद्धी गणपतीच्या मांडीवर विराजमान असून मूर्तीच्या उजव्या आणि डाव्या बाजूने जय-विजय यांच्या मूर्ती आहेत. सध्या असलेले मंदिर 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात इंदूरच्या देवी अहिल्याबाई होळकर यांनी परत बांधले होते. मंदिर उत्तराभिमुख असून काळ्या पाषाणाचा (दगडाचा) वापर करून बांधलेले आहे. सिद्धिविनायक मंदिराचा गर्भगृह 15 फूट उंच असून 10 फूट रुंद आहे.

रोज सकाळी ५.१५ वा., ११ वा., दुपारी १२ वा., रात्री 8 वा. आणि ९ वा. अशा  दिवसातून ५-६ वेळा गणपतीची वेगवेगळी नैवद्यपूजा-आरती केली जाते. येथे भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यात गणेश जयंती हे सण आनंदाने साजरे केले जातात.

बल्लाळेश्वर मंदिर, पाली

बल्लाळेश्वर हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पाली गावात स्थित गणपतीचे मंदिर असून अंबा नदी आणि सुप्रसिद्ध किल्ला सरसगडच्या मध्ये वसलेला आहे.  पुण्यापासून बल्लाळेश्वर (पाली) हे अंतर सुमारे १२१ किलोमीटर (पुणे- लोणावळा -खोपोली मार्गे) आहे. गणपतीच्या पौराणिक कथांमधे अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून बल्लाळेश्वर ओळखला जातो. बल्लाळेश्वर गणपती पाली हे स्वयंभू स्थान म्हणून ओळखले जाते.

जुने मंदिर हे लाकडाचे होते नंतर १७६० मध्ये नाना फडणवीस यांनी दगडाच्या मंदिराचे बांधकाम केले. हे मंदिर पूर्वाभिमुख असून असे वैशिष्टपूर्ण बांधले आहे कि उगवत्या सूर्याची किरणे थेट मूर्तीच्या अंगावर पडतात. पाषाणाच्या सिंहासनावर बल्लाळेश्वराची मूर्ती स्थित असून गणपतीचे कपाळ आणि  डोळे हिऱ्यांनी जडलेले आहेत. बल्लाळेश्वराच्या मूर्तीची उंची तीन फुट आहे. मूर्तीच्या अंगावर वेगवेगळी अस्त्रे चढवलेली असतात जशी उपरणे, अंगरखा इत्यादी. मंदिरा पुढील गाभा-यात दोन पायात मोदक पकडून बसलेल्या उंदीराचे शिल्प आहे. मंदिराच्या आवारात चिमाजी अप्पा (पेशवे) यांनी भेट केलेली मोठी घंटा आणि सभामंडप आहे. मंदिराच्या बाजूलाच पाण्याचे तलाव असून त्यांचे पाणी पूजेसाठी वापरतात.

भाद्रपद महिन्यात आणि माघ महिन्यात येथे उत्सव साजरे केले जातात.

वरदविनायक मंदिर, महाड

वरदविनायक मंदिर रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात महाड गावात आहे. पुणे-मुंबई महामार्गापासून हे मंदिर सुमारे ४ किमी दूर आहे तसेच पुण्यापासून मंदिर जवळपास २२८ कीलोमीटर आहे. अष्टविनायकांपैकी महाडचा वरदविनायक हा चौथा गणपती आहे.  जश्या इतर सर्व अष्टविनायक मुर्त्या स्वयंभू आहेत तशी वरदविनायकाही मूर्तीही स्वयंभू आहे. हि मूर्ती १६९० साली धोंडू पौढकर यांना या ठिकाणी असलेल्या तलावात सापडली. १७२५ वर्षी कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी वरदविनायकाचे मंदिर बांधून महड गावही वसवले.

येथे आपल्याला गणपतीच्या दोन मूर्त्या दिसतात, एक गाभाऱ्याच्या बाहेर असून दुसरी गाभाऱ्याच्या आत आहे. गणेशाची मूर्ती डाव्या सोंडेची आहे व सिंहासनावर रूढ आहे. वरदविनायकाचे मंदिर कौलारूचे असून मंदिराला सुंदर घुमट आहे व त्यावर सोनेरी कळस आणि कळसावर नागाची नक्षी आहे.

वरदविनायक मंदिरात भगवान गणेशाच्या दर्शनासाठी जगभरातून लोक येतात.  हे एकमेव मंदिर आहे जिथे भक्तांना दर्शनासाठी गाभाऱ्यात प्रवेश करण्याची परवानगी आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे आणि त्याच्या चारही दिशांना चार हत्तीची शिल्पे आहेत. १८९२ पासून ह्या मंदिरात अखंड(नंदादीप) दिवा जळत आहे. हे मंदिर अतिशय प्रसिद्ध असून येथे येणाऱ्या भक्तांना दररोज दुपारी १२ पासून २ पर्यंत महाप्रसाद दिला जातो.

येथे महत्त्वाचे दोन उत्सव साजरे होतात जसे भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी आणि माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी. ह्या उत्सवात भक्त आपली इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करतात. संकष्टी चतुर्थीला पण नेहमीच येथे उत्सव साजरा केला जातो.

चिंतामणी मंदिर, थेऊर

पुणे ते चिंतामणी गणपती मंदिर हे अंतर २७ किलोमीटर आहे. श्री चिंतामणी मंदिरअष्टविनायकांमधील सर्वात भव्य असून तेवढेच प्रसिद्धहि आहे. मंदिरातील मूर्ती स्वयंभू आहे तसेच डाव्या सोंडेची व आसनारुढ पूर्वाभिमुख आहे. मूर्तीचे दोन्ही डोळे लाल मणी आणि हिऱ्यांनी मढवलेले आहेत.

हे मंदिर दगडचे बांधले असून लाकडाचाही उपयोग केला आहे आणि आजही मजबूत स्थितीत आहे. आता असलेले मंदिर हे मोरया गोसावींनी बांधले आहे.

मंदिराच्या आवारात युरोपीयांकडून पेशव्यांना मिळालेली पितळाची मोठी घंटा आहे. थोरले माधवराव पेशवे या मंदिरात नेहमी दर्शनाला येत असत त्यांची श्री चिंतामणी गणपतीवर खूप श्रद्धा होती. माधवराव पेशवेंना २७ व्या वर्षी क्षयरोग झाला होता आणि या मंदिरातच या गणपतीसमोरच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

मुळा-मुठा नदींने वेढलेले हे श्री क्षेत्र थेऊर पुणे-सोलापूर रेल्वेमार्गावर पुण्यापासून २५ कि.मी. अंतरावर असलेल्या लोणी गावापासून फक्त सात कि.मी.वर आहे.

गिरिजात्मज मंदिर, लेण्याद्री

गिरिजात्मज गणपती मंदिर लेण्याद्री पर्वतामधे असलेल्या २८ लेण्यांपैकी सातव्या क्रमांकाच्या लेणीमध्ये आहे. या गणपतीला लेण्याद्रीचा गिरिजात्मज असेही म्हटले जाते. पुण्यापासून गिरिजात्मज गणपती मंदिर हे अंतर सुमारे १०१ किलोमीटर अंतरावर आहे. हे अंतर जुन्नर पासून सुमारे ७ किलोमीटर आहे. मंदिर सुमारे १७०० वर्षे जुने आहे.

हे मंदिर अखंड खडकामध्ये कोरून बनवले असून अत्यंत साधे आहे. भक्तांना मूर्तीपर्यंत जाण्यासाठी सुमारे २८०-२९० पायऱ्या चढाव्या लागतात. गिरिजात्मज गणपतीची स्वयंभू मूर्ती प्रकट झालेली असून उत्तराभिमुख आहे. मूर्तीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला महादेव आणि हनुमानाच्या मूर्ती कोरल्या आहेत. मूर्तीच्या नाभीत आणि कपाळावर हिरे बसविलेले आहेत. गणपतीच्या मूर्तीला आपल्याला प्रदक्षिणा घालता येत नाही कारण मूर्तीच्या मागचा भाग भव्य डोंगराने व्यापला आहे.

मुख्य मंदिरासमोर बौद्ध भिक्खूंसाठी साठी रेखीव, भव्य असा ५१ फूट रुंद व ५७ फूट लांब सभामंडप आहे.  विशेष म्हणजे या सभामंडपाला कोठेही खांबाचा आधार नाही. सभामंडपाच्या समोरील  बाजूस रेखीव खांब आहेत. तसेच मंदिरासमोर पाण्याची दोन कुंड आहेत.

गणेश चतुर्थी सारखे सण येथे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. या दिवसात मंदिराला फुले आणि दिव्यांनी सुशोभित केले जाते. महाराष्ट्रातील तसेच भारतातील विविध भागांमधून भक्तगण गणेशाची पूजा करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी गिरिजात्मज गणपती मंदिराला भेट देतात.

विघ्नेश्वर मंदिर, ओझर

ओझर येथील विघ्नेश्वर मंदिर पुण्यापासून ८५ किलोमीटर अंतरावर आहे. अष्टविनायकापैकी ओझरचा विघ्नेश्वर हा पाचवा गणपती आहे. अष्टविनायकापैकी सर्व श्रीमंत गणपती म्हणूनहि श्री विघ्नेश्वराला ओळखले जाते. अशी प्रसन्न व मंगलमूर्ती असलेला श्री गणेश भक्तांवर आलेल्या बिघनांचे हरण करतो म्हणून या गणपतीला विघ्नेश्वर म्हणतात. या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर चार द्वारपाल आहेत. ही गणेशांची स्वयंभू मूर्ती आहे. या पूर्वाभिमुख गणपतीची सोंड डावीकडे असून त्याचे डोळे हिऱ्यांनी मढवले आहे. नेहमीप्रमाणे गणपतीच्या आजूबाजूला रिद्धी आणि सिद्धी यांच्या मुर्त्या आहेत. या ठिकाणी मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी बांधकाम असून मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर वसलेले हे मंदिर जागृत स्थान आहे. या मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे.  ओझर गणपती मंदिराचा कळस सोनेरी असून

भाद्रपदमध्ये गणेश जयंतीला येथे चार दिवस उत्सव मोठया आनंदाने साजरा केला जातो. गणेशोत्सव आणि संकष्टी चतुर्थीला भक्तांची येथे दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी होते.

महागणपती मंदिर, रांजणगाव

पुणे-अहमदनगर महामार्गावर पुण्यापासून ५२ किलोमीटर अंतरावर रांजणगाव येथे श्री महागणपती मंदीर आहे. महागणपती रांजणगाव हे अष्टविनायकपैकी एक आहे. अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणून रांजणगावचा गणपती म्हणून ओळखला जातो. रांजणगावातील श्री गणपतीचे मंदिर मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूला आहे. मंदीर पूर्वाभिमुख असून याला भव्य आणि सुंदर प्रवेशद्वार आहे. मंदिराची बांधणी अशा प्रकारे केली आहे की दक्षिणायनाच्या सूर्योदयाच्या श्रीगणेशावर सूर्यकिरणे पडतात. मूर्तीच्या बाजूला रिद्धी सिद्धी आहेत. गणेशाच्या मूर्तीच्या खालच्या बाजूला तळघर आहे. या तळघरात महागणपतीची दुसरी एक लहान मूर्ती आहे. या मूर्तीला दहा सोंडा व वीस हात असून हीच गणपतीची मूळ मूर्ती आहे असे सांगितले जाते. हा गणपती भक्तांच्या नवसाला हमखास पावतो अशी भक्तांची श्रद्धा आहे. मंदिराच्या आवारातील परिसराचे नव्याने सुशोभीकरण करण्यात आले आहे. सध्या असलेले महागणपतीचे मंदिर हे पेशवेंनी बांधले आहे. 

भाद्रपद शुद्ध चतुर्थीम्हणजेच गणेश चतुर्थीला इथे खूप मोठा उत्सव साजरा केला जातो. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा पासून भाद्रपद शुद्ध पंचमी या पाच दिवसांत दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भक्तांना देवाच्या गाभाऱ्यात मूर्तीपर्यंत जाऊन दर्शन घेण्याची मुभा असते.

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button