सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेक (दुसरा गणपती) | Siddhivinayak Ganpati Temple
सिद्धटेक (सिद्धिविनायक) हे देवस्थान अहमदनगर जिल्ह्यात असून अष्टविनायकांमधील हे अनुक्रमे दुसरे गणपतीचे देऊळ आहे. पुण्यापासून सिद्धिविनायकाचे मंदिर १६० किलोमीटर अंतरावर असून भीमा नदीकाठी वसलेले आहे.
सिद्धिविनायकाची कथा
श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा तसेच भक्तांचे कार्य सिद्ध करणारा हा गणपती अष्टविनायक गणेशांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे. पुराणातील कथेनुसार हा गणपती असलेला संपूर्ण डोंगरच दैवी शक्तीने प्रभावित आहे. सिद्धटेकची ख्याती अशी आहे कि सिद्धिविनायकला सलग २१ दिवस २१ प्रदक्षिणा पूर्ण केल्यास आयुष्यातील अपुर्ण राहिलेली तसेच विघ्न बाधित कार्ये पूर्णत्वास जातात.
मुद्गल पुराणाच्या कथेनुसार सृष्टीच्या निर्माणच्या सुरुवातीस, श्रीहरी विष्णू जेव्हा त्यांच्या योगनिद्रेत होते. त्यावेळी विष्णूच्या नाभीतून एक कमळ फुलले (उगवले) होते आणि सृष्टीचे निर्माते म्हणजेच देव ब्रह्मा याच कमळातून उदयास आले. ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती सुरू केली तेव्हाच कैटभ आणि मधु हे दोन दानव विष्णूच्या कानातील माळातून प्रगट झाले. याच दानवांनी ब्रह्मादेवाच्या सृष्टि निर्माणामधे अडथळे आणण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे साक्षात विष्णूला त्यांच्या योगनिद्रेतून जागृत करावे लागले. विष्णूंनी कैटभ आणि मधु या विनाशकारी राक्षसांसोबत युध्द केले पण त्या दानवांचा पराभव करू शकले नाहीत. त्यानंतर महादेवांनी विष्णूला सांगितले की तुम्ही युद्धाआधी, शुभ कार्याचा आरंभ असलेल्या आणि कार्यातील विघ्ने दूर करणाऱ्या देवाला म्हणजेच गणपतीला वंदन करायला विसरले आणि त्यामुळेच ते दानवांना पराभूत करू शकले नाही. मग विष्णूंनी सिद्धटेकला तपश्चर्या करून गणरायाला प्रसन्न केले. गणपती बाप्पा प्रसन्न झाल्याने, श्री गणरायांनी विष्णूला वरदान दिले आणि विशेष सिद्धी (“शक्ती”) प्रदान केली. त्यानंतर विष्णूंनी दोन्ही राक्षसांसोबत युद्ध करून त्यांचा वध केला. विष्णूंनी ज्या स्थळी गणरायांकडून सिद्धि प्राप्त केली त्या जागेला सिद्धटेक म्हणून ओळखले जाऊ लागले.
मंदिर आणि परिसर
सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू आहे आणि मूर्ती सुमारे अडीच फूट रुंदआणि ३ फूट उंच आहे. सिद्धिविनायकाची मूर्ती गजमुखी आहे. येथील रिद्धि आणि सिद्धी च्या प्रतिमा गणपतीच्या मांडीवर विराजमान आहेत. सिद्धिविनायकाच्या उजव्या आणि डाव्या बाजूने जय-विजय यांच्या मूर्ती आहेत. प्रभावळीवर सूर्य, चंद्र, गरुड यांच्या आकृत्या कोरलेल्या असून मधोमध नागदेवता आहे. मंदिर उत्तराभिमुख आहे तसेच काळ्या दगडाचा वापर करून बांधलेले आहे. सिद्धिविनायक मंदिराचा गर्भगृह 10 फूट रुंद असून 15 फूट उंच आहे.
मंदिराला एक प्रदक्षिणा घालायची झाल्यास ५ किमीचा प्रवास करावा लागतो कारण ही मूर्ती डोंगराला जोडलेली आहे त्यासाठी जवळपास अर्धा तास वेळ लागतो. सध्या स्थित असलेले देऊळ 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात इंदूरच्या देवी अहिल्याबाई होळकरांनी पुन्हा बांधले होते. आणि टेकडीवर स्थित असलेल्या या मंदिराचा रास्ता पेशव्यांचे सरदार असलेल्या हरिपंत फडके यांनी तयार केला होता. पेशव्यांनी हरिपंत फडके यांचे सरदारपद काढून घेतले होते , तेव्हा हरिपंत्यांनी या मंदिरास २१ प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर २१ दिवसांनी त्यांची सरदारकी त्यांना परत मिळाल्याची कथा (माहिती) सांगितली जाते. सिध्दटेकलाच संत मोरया गोसावी यांनाही सिद्धी प्राप्त झाली होती. असाधारण नयनरम्य पवित्र असा नैसर्गिक परिसर लाभलेल्या या मंदिराच्या जवळून अगदी म्हणजे सिद्धटेक टेकडीच्या पायथ्याला लागूनच भीमा नदी वाहते.
सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेकला कसे जाल?
सिद्धटेकला जाण्यासाठी भक्तांना सर्वात सोयीचे रेल्वे स्टेशन म्हणजे दौंड. दौंडवरून बसने शिरापूर मार्गे जावे लागते, दौंडपासून सिद्धटेक हे अंतर १८ किलोमीटर आहे. आधी शिरापूर येथुन होडीने जावे लागत असे त्यासाठी नदीवर सतत होड्या चालू असत, आता मात्र नदीवर पूल झाला असून गाड्या थेट मंदिरापर्यंत जातात. पुण्याहून जाताना हडपसर-लोणी-यवत-चौफुला-पाटस-दौंडमार्गे सिद्धटेक ९८ किलोमीटर वर आहे. तसेच दौंड-काष्टी-पेडगावमार्गेहि सिद्धटेकला जात येते हे अंतर ४८ किलोमीटर आहे.