गडकिल्ले
Trending

शिवनेरी किल्ला | Shivneri Fort

शिवनेरी किल्ला भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख किल्ला आहे तसेच हा किल्ला दुर्ग प्रकारातील किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता म्हणून या किल्ल्याला ऐतिहासिक महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला हा किल्ला पुण्यापासून ९८ किलोमीटर अंतरावर आहे. शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला जुन्नर शहरापासून ४ किलोमीटरवर आहे.

शिवनेरी किल्ला हा महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून भारत सरकारने दि. २६ मे, इ.स. १९०९ रोजी घोषित केला होता.

शिवनेरी किल्ला १७ व्या शतकात यादवांनी सुमारे ३५०० फूट उंच नाणेघाट डोंगरावर बांधला होता. हा किल्ला महादेवाच्या पिंडीच्या आकाराचा असून येथे शिवाई देवीचे मंदिर आणि जिजामाता तसेच शिवाजी नमहाराजांच्या बालपणातील प्रतिमा आहेत. शिवनेरी किल्ल्याला चारही बाजूंनी उंच व कठीण चढाव असून त्याला सर करून जाण्यास शक्य नसल्याने जिंकावयास कठीण आहे.

जुन्नर शहरापासून किल्ला जवळच असल्यामुळे तिथून किल्ले शिवनेरी अगदी स्पष्ट दिसतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा किल्ला जास्त मोठा नाही तरीही खूप प्रसिध्द आहे.

१६७३ या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीचे डॉ. जॉन फ्रायर यांनी शिवनेरी किल्ल्याला भेट दिली होती. त्याने लिहलेल्या पुस्तकात, या किल्ल्यावर एक हजार कुटुंबांना सुमारे ७ वर्षे पुरेल एएवढा अन्नधान्याचा साठा असल्याचा उल्लेख केला आहे.

शिवनेरी किल्ला गडावर जाण्याच्या वाटा

पुण्यातील आणि मुंबईतील पर्यटकांना एकाच दिवसात शिवनेरी किल्ला पाहून परत घराकडे जात येते. जुन्नर गावातून या गडावर पोहचण्यासाठी दोन मुख्य वाटा आहेत.

साखळीची वाट:

साखळीच्या वाटेने शिवनेरीवर जाताना जुन्नर शहरातील नवीन बसस्टँड समोरच्या रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहचले असता येथे चार रस्ते एकत्र असलेले दिसतात. डाव्या बाजूच्या रस्त्याने सुमारे एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर आहे. याच मंदिरासमोरून एक पायवाट जाते या पायवाटेने गेल्यास आपण थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळभिंतीजवळ पोहचतो. या कातळभिंतीला बसवलेल्या साखळीच्या आणि कातळात खोदलेल्या पायऱ्यांच्या साह्याने किल्ल्यावर पोहचता येते. ही साखळीची वाट काहीशी कठीण असून गडावर पोहचण्यास सुमारे ५० मिनिटे लागतात.

सात दरवाज्यांची वाट:

जुन्नरमधून पुढे गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून जाणाऱ्या डाव्या बाजूच्या रस्त्याने पुढे गेल्यास डांबरी रोड आपल्याला शिवनेरी किल्याच्या पायऱ्यांजवळ घेऊन जातो. याच पायऱ्यांनी गडावर जाताना महादरवाजा, पीर दरवाजा, परवानगीचा दरवाजा, हत्ती दरवाजा, शिपाई दरवाजा, फाटक दरवाजा आणि कुलाबकर दरवाजा असे नुक्रमे सात दरवाजे आहेत. या मार्गाने किल्ल्यावर पोहचण्यासाठी जवळपास दीड तास वेळ लागतो.

शिवनेरी किल्ल्यावरील महत्वाची ठिकाणे

शिवाई देवी मंदिर

सात दरवाज्याच्या वाटेने गडावर जाताना पाचवा शिपाई दरवाजा ओलांडून मुख्य रस्त्यावरून डावीकडे वळल्यानंतर आपण शिवाई देवीच्या मंदिरात पोहोचतो. शिवाई देवीच्या मंदिरात शिवाईची मूर्ती असून मंदिरामागील खडकात ६-७ गुहा आहेत पण या गुहा रात्रभर राहण्यायोग्य नाहीत.

शिवकुंज

शिवकुंज हे शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहे. शिवकुंजची पायाभरणी महाराष्ट्राच राज्याचे सर्वात पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी केली होती तसेच शिवकुंजचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले होते. बालपणातील शिवाजी महाराज आपली छोटी तलवार फिरवत आपल्या आई जिजामातेला आपल्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नांचे वर्णन करीत आहे असा या स्मारकाचा विषय आहे.

अंबरखाना

शेवटच्या दरवाजा म्हणजेच कुबालकर दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना दिसतो. आता याची परिस्थिती काहीशी अवघड दिसते म्हणजे याचे खूप नुकसान झाले आहे. पूर्वी याच अंबरखान्यात संपूर्ण अन्नधान्य साठवले जात असे.

कडेलोट कड़ा

समोरच उंचीवरून जाणारा रास्ता कडेलोत कडा येथे जातो या ठिकाणाहून गुन्हेगारांना खाली ढकलून देऊन शिक्षा दिली जात असे.

पाण्याच्या टाक्या

वर चढत जाताना वाटेत अनेक पाण्याच्या टाक्या आहेत जशा गंगा, यमुना इत्यादी.

शिवनेरी किल्ल्यावर कसे जाल?

पुणेहून नारायणगाव मार्गे रस्त्याने:

पुणे मधून जाताना चाकण-राजगुरूनगर-मंचर-नारायणगाव मार्गे १०२ किलोमीटर अंतर असून पोहचायला सुमारे २ तास ३५ मिनिटे लागतात. आपण महामंडळाच्या एस टी बसेस तसेच आपल्या खासगी वाहनानेसुद्धा जाऊ शकतो.

मुंबईवरन रस्त्याने:

मुंबईवरन ठाणे-कल्याण मार्गे शिवनेरी वर पोहचायला सुमारे ४ तास १५ मिनिटे लागतात. आपण महामंडळाच्या एस टी बसेस तसेच आपल्या खासगी वाहनानेसुद्धा जाऊ शकतो. मुंबईवरन माळशेज घाटमार्गे जुन्नरला जाताना माळशेज घाट ओलांडल्यानंतर रस्त्याच्या बाजूस ९ किलोमीटर अशी पाटी लावलेली दिसते. हा रस्ता गणेश खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत पोहचतो. या रस्त्याने गडावर जाण्यास मुंबईपासून एक दिवस लागतो.

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button