बल्लाळेश्वर मंदिर, पाली | Pali Ganpati Ballaleshwar Temple
बल्लाळेश्वर हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असलेल्या पाली गावातले गणपतीचे मंदिर आहे. गणरायाच्या पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वर ओळखला जातो. गणपतीचे मंदिर अंबा नदी आणि सुप्रसिद्ध किल्ला सरसगडच्या मधोमध वसलेला आहे. बल्लाळेश्वर गणपतीचे हे देवस्थान स्वयंभू म्हणून ओळखले जाते. पुण्यापासून बल्लाळेश्वर (पाली) हे अंतर सुमारे १२१ किलोमीटर आहे. बल्लाळ हा या गणपतीचा अनन्य भक्त होता म्हणून अष्टविनायकातील हा एकमेव गणपती आहे की जो बल्लाळ नाव असलेल्या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे.
बल्लाळेश्वर गणपती मंदिराची कथा
पुराणिक कथेनुसार त्रेता युगात सिंधू देशातील कोकण पल्लीर नावाच्या गावात (पाली गावात) कल्याण नावाचा एक वाणी त्याची पत्नी इंदुमती बरोबर राहत होता. वाणी आणि इंदुमती यांना मुलगा झाल्यावर त्यांनी त्याचे नाव बल्लाळ असे ठेवले. बल्लाळ हा जसजसा मोठा होत होता तसतसा तो गणरायाच्या भक्तीमध्ये तल्लीन होत गेला. बल्लाळसोबत त्याच्या मित्रांनाही गणपतीच्या पूजेची आवड लागली.
बल्लाळ आणि त्याचे मित्र गावाबाहेर जाऊन रानात गणेशमूर्तीचे भजन-पूजन करू लागले. हि सर्व मुले गणेशभक्तीमध्ये इतकी रमून जायची की त्यांना दिवस-रात्र, भूक-तहान कशाचेही भान राहत नव्हते. गावातील लोक कल्याण शेठ्कडे जाऊन बल्लाळमुले त्यांची मुलं बिघडले अशी तक्रार करू लागले. त्यामुळे कल्याण वाणीना आपला मुलगा बल्लाळ एवढ्या कमी वयात भक्तिमार्गाला लागला तसेच त्याने इतर मुलांनाही भक्तिच्या वाईट नादाला लावले या विचाराने राग आला. याच रागाच्या भरातच वाणी एक काठी घेऊन बल्लाळ ज्या रानात सवंगड्यांसह गणेशमूर्तीची पूजा करीत होता तेथे गेले. तेथे गेले असता आपला मुलगा बल्लाळ गणेशाच्या ध्यानात अगदी मग्न असल्याचे पाहून कल्याण वाणीला आणखीच राग आला. कल्याण शिव्या देत, ओरडतच तेथे धावत जाऊन त्याने ती पूजा मोडून गणेशाची मूर्ती फेकून दिली. हे बघून बल्लाळचे मित्र भीतीने पळून गेली, पण बल्लाळ तसाच गणेसहाच्या ध्यानात तल्लीन होता. कल्याण वाणीने बल्लाळास काठीने झोडपून काढले. बल्लाळ काठीच्या माराने रक्तबंबाळ झाला, बेशुद्ध पडला तरीही कल्याण वाणीला त्याची दया आली नाही. त्याने बल्लाळाला होता तशाच अवस्थेत एका झाडाला लांब वेलींनी बांधले आणि रागाने म्हणाला,आता येऊ दे तुझा गणपतीला तुला सोडवायला. आजपासून तुझा आणि माझा संबंध कायमचा संपला, घरी आलास तर तुला ठार मारीन असे म्हणून कल्याण तेथून निघून गेला.
बल्लाळ शुद्धीवर आल्यावर आपल्या शरीराला झालेली दुखापत न बघता गणरायाची भक्ती-जप-चिंतन सुरूच ठेवले आणि आता मी तुझे चिंतन करीतच माझा देहत्याग करीन असा म्हणाला. बल्लाळाची अशी भक्ती बघून गणपती ब्राह्मण रूपात प्रगट झाले आणि बल्लाळाकडे आले. गणपतीने बल्लाळाला स्पर्श करताच बल्लाळाची तहान,भूक नाहीशी होऊन त्याच्या जखमा भरून निघाल्या. बल्लाळाने ब्राम्हण वेशात आलेल्या गणरायाला लगेच ओळखले आणि गणरायाच्या पायावर लोटांगण घातले. तेव्हा गणपती बल्लाळला म्हटले तुझ्या परमभक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तू माझ्या भक्तीचा आद्यप्रवर्तक, विद्वान आणि दीर्घायुषी होशील, तुला हव ते वरदान माग.’
तेव्हा बल्लाळने असे वर मागितले कि, तू कायमचा याच ठिकाणी राहून भक्तांचे दुःख दूर करून त्याच्या इच्छा पूर्ण कराव्यात तसेच हे स्थान गणेश क्षेत्र म्हणून प्रसिद्धीस यावं. तेव्हा गणपती म्हणाला – ”तू मागितलेल्या वरानुसार माझा एक अंश कायमचा इथेच राहील आणि ‘बल्लाळ विनायक’ या नावाने ओळखला जाईल.
भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जे भक्त माझ्या दर्शनाला येथे येतील त्यांच्या सर्व मनःकामना पूर्ण होतील. असे वरदान देऊन गणपती जवळ असलेल्या एका शिळेत लुप्त पावला हिच शिळा बल्लाळेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे. कल्याण वाणीने फेकलेल्या दगडाला धुंडीविनायक असे संबोधिले जाते तसेच ही स्वयंभू मूर्ती आहे त्याची पूजा बल्लाळेश्वराच्या पूजेआधी केली जाते.
श्री बल्लाळेश्वर मंदिर आणि परिसर
बल्लाळेश्वराचे जुने मंदिर पूर्णपणे लाकडाचे होते नाना फडणवीस यांनी १७६० मध्ये दगडाच्या मंदिरात रूपांतर केले. या मंदिराचे एक वैशिष्ट आहे हिवाळ्यात कि दक्षिणायनात सुर्योदय होताच उगवत्या सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात. बल्लाळेश्वराचे मूर्तीचे तोंड पूर्वेकडे असून ही 3 फूट उंचीची मूर्ती स्वयंभू आहे. दगडाच्या सिंहासनावर बल्लाळेश्वराची मूर्ती विराजमान आहे. श्री गणपतीची सोंड डावीकडे वाकलेले असून मूर्तीचे कपाळ, डोळे आणि नाभी हिऱ्यांनी जडलेली आहेत. मूर्तीच्या अंगावर वेगवेगळी अस्त्रे चढवलेली असतात जशी उपरणे, अंगरखा इत्यादी. मूर्तीची पार्श्वभूमी चांदीची आहे आणि त्यावर रिद्धी आणि सिद्धी वीणा (चामरे) घेऊन बसलेले दिसतात. मंदिराच्या आवारात चिमाजी अप्पा (पेशवे) यांनी भेट केलेली भव्य अशी पितळीची घंटा आहे. मंदिराच्या आतमध्ये 15 फूट उंच सभामंडप असून याच मंडपात बल्लाळेश्वराची मूर्ती विराजमान आहे तसेच बाहेरसुद्धा एक 12 फूट उंच सभामंडप आहे. बाहेरील सभामंडपात गणेशाचे वाहन असलेल्या उंदीराचे शिल्प दोन पायात मोदक पकडून बसलेल्या स्वरूपात आहे. मंदिराच्या बाजूलाच तलाव असून त्यांचे पाणी पूजेसाठी वापरतात. मंदिराजवळ पाण्याचे दोन तलाव आहेत यापैकी एकाचे पाणी गणरायाच्या पूजेसाठी वापरले जाते.
श्री बल्लाळेश्वर पूजा आणि उत्सव
सकाळी ८ वाजेपर्यंत सर्व भक्तगण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करू शकतात मात्र ८ नंतर भाविक गाभाऱ्यात जाऊ शकत नाहीत. माघ प्रतिपदा ते माघ पंचमी या दिवसात येथे गणेश जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. तसेच गणेश चतुर्थीला महानैवेद्य आणि पंचमीला दहीकाल्याचा नैवेद्य बल्लाळेश्वराला असतो. येथे येणाऱ्या सर्व भकटाची अशी मान्यता आहे की गणपती स्वतः येऊन तो नैवेद्य ग्रहण करतो आणि गणपतीच्या बोटांचे ठसेसुद्धा नैवेद्यावर सोडतो. येथे भजन-कीर्तनाचा भव्य कार्यक्रम असतो तसेच पाचही दिवस गणपतीची पालखी काढली जाते. तसेच अंगारकी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीसुद्धा साजरी केली जाते.
पुण्यापासून सर्व अष्टविनायक मंदिरांदरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या विशेष एसटी बसेस सुरु असतात. खासगी टूर कंपन्याही अष्टविनायक यात्रा-सहली आयोजित करतात. सर्व मंदिरांच्या ठिकाणी भक्तांना राहण्याची सोय म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या धर्मशाळा, हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत.
बल्लाळेश्वर गणपती मंदिर पाली येथे कसे जायचे?
पाली बल्लाळेश्वर गणपती मंदिर रस्त्याने: बंगलोर – मुंबई महामार्ग / मुंबई महामार्ग / मुंबई – पंढरपूर रोड / मुंबई – पुणे महामार्ग आणि SH92 मार्गे, जो आता रहदारीच्या परिस्थितीमुळे सर्वात जलद मार्ग आहे. कर्जत पासून 30 कि.मी. पाली हे पनवेल आणि खोपोली मार्गे मुंबईपासून १२४ किमी अंतरावर आहे.
पाली बल्लाळेश्वर गणपती मंदिर रेल्वेने: पालीचे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन कर्जत आहे, जे बल्लाळेश्वर पाली गणपती मंदिरापासून 30 किमी अंतरावर आहे.
पाली बल्लाळेश्वर गणपती मंदिर विमानाने: मुंबई आणि पुणे ही जवळची विमानतळे आहेत.
पाली जवळची ठिकाणे:
उन्हेरे-गरम पाण्याचे झरे (पालीपासून तीन किमी)
उध्दर-रामाने जटायूचा उद्धार केला ते ठिकाण (पालीपासून चार किमी)
सिद्धेश्वर-शंकराचे स्वयंभू मंदिर(पालीपासून तीन किमी)