महाड येथील वरदविनायक मंदिर | Mahad Ganpati Varadvinayak Temple
वरदविनायक मंदिर(महाड) रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात आहे. पुणे-महाड हे अंतर सुमारे १४० कीलोमीटर लांब आहे. तसेच पुणे-मुंबई महामार्गापासून हे मंदिर ४ किमी दूर खोपोली जवळ आहे. अष्टविनायक गणपती पैकी महाडच्या वरदविनायकाचा अनुक्रमे चौथा क्रमांक येतो. वरदविनायक गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे म्हणजेच स्वतः प्रगट झालेली आहे
श्री क्षेत्र वरदविनायकाची कथा
पुराणानुसार प्राचीनकाळात कौन्डीन्यपूरचा भीम नावाचा एक शूर व दानी राजा होता. राजा आणि राणी यांना मूलबाळ नसल्याने ते दुःखी होते. तेवढ्यात ते दोघेही जंगलात तपस्या करीत असलेल्या ऋषी विश्वामित्र यांना भेटायला गेले. राजा राणीचे दुःख समजून विश्वामित्र ऋषींनी राजाला एकाक्षर मंत्राचा जप करायला सांगितला. त्याच मंत्राच्या अखंड जपामुळे विनायक त्याच्यावर प्रसन्न झाला आणि विनायकाने त्यांना पुत्रप्राप्तीचे वरदान दिले.
वरदानानुसार राजाला एक पुत्र झाला त्याचे नाव रुक्मांगद असे ठेवले. रुक्मांगद वयाने मोठा आणि कर्तृत्ववान झाल्यावर भीम राजाने संपूर्ण राज्यकारभाराची धुरा त्याच्यावर सोपविली.
रुक्मांगद राजा एकदा शिकारीसाठी अरंण्यात भटकत असताना तो वाचक्नवी ऋषींच्या आश्रमात जाऊन राहिला. ऋषींची पत्नी मुकुंदा रुक्मांगदच्या प्रेमात पडली. ऋषींची पत्नी मुकुंदा रुक्मांगदाला पाणी देतानाच त्याच्यावर अनुरुक्त झाली, पण रुक्मांगदाने तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि तिची इच्छा पूर्ण केली नाही. आपले प्रेम न स्वीकारल्यामुळे कामविव्हल झालेल्या ऋषीपत्नी मुकुंदेने ‘तू कुष्ठरोगी होशील’ असा रुक्मांगदाला शाप दिला.
रुक्मांगदाला शाप मिळताच तेजस्वी असलेले त्याचे शरीर कुष्ठरोगाने अतिविद्रूप झाले. दुःखी झालेला रुक्मांगद रानात भटकत असता त्याला नारदमुनी भेटले असता त्यांच्या म्हणण्यानुसार रुक्मांगदाने कदंब गावातील कदंब तीर्थात स्नान करून तेथील चिंतामणी गणेशाची भक्ती केली. गणरायाच्या आशीर्वादामुळे रुक्मांगद शापमुक्त होऊन त्याला झालेला कुष्ठरोग नाहीसा झाला.
इकडे मुकुंदा रुक्मांगदासाठी झुरत असल्याचे पाहून इंद्राने रुक्मांगदाचे रूप धारण करून मुकुंदाची इच्छा पूर्ण केली. रुक्मांगदरुपी इंद्रापासून मुकुंदाला दिवस जाऊन तिने ग्रीत्सम्द नावाच्या मुलगा झाला. मंत्रदृष्टा व द्वितीय मंडळाचा कर्ता म्हणून ऋग्वेदामध्ये प्रसिद्ध आहे. ग्रीत्सम्दचा जन्म कसा झाला हे सर्व जनतेला कळले होते म्हणून आपल्या आईच्या पापकर्मामुळे लोक त्याला हिणवू लागली होती. तेव्हा ग्रीत्सम्द त्याच्या आईकडून संपूर्ण सत्य जाणून घेतो आणि तिला शाप देतो. मग ग्रीत्सम्द पापक्षालनार्थ भद्रक (पुष्पक) जंगलात तपस्येतून विनायकाची आराधना करू लागतो. विनायक प्रसन्न होऊन त्याला वरदान देतो कि, त्याला अत्यंत बलशाली तसेच धाडसी मुलगा होईल ज्याला केवळ भगवान महादेव पराभूत करू शकतील.
तसेच ग्रीत्सम्दने विनायकाला विनंती केली कि तू याच जंगलात कायमचे वास्तव्य करून सर्व भाविक भक्तांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण कर. गणपतीने ग्रीत्सम्दची विनन्ती स्वीकारून याच जंगलात राहू लागले तेच वन पुष्पक म्हणजेच भद्रक वन तसेच महाड क्षेत्र होय. ग्रीत्सम्दने या ठिकाणी गणपतीची स्थापना करून मंदिराचा जीर्णोद्धार केला येथे त्याला वर मिळाले होते म्हणून या गणपतीला वरद विनायक म्हणतात. ग्रीत्सम्द हा गाणपत्य संप्रदायाचा आद्य प्रवर्तक म्हणून ओळखला जातो. मागील काळात महडचे नांव मणिपूर वा मणिभद्र होते. असे मानस आहे की माघातील चतुर्थीला इथे प्रसादरुपी मिळालेल्या नारळाच्या सेवनाने पुत्र प्राप्ती होते त्यामुळे माघ महिन्यातील उत्सवात या मंदिरात भक्तांची अफाट गर्दी असते.
श्री वरदविनायकाचे मंदिर आणि परिसर
अष्टविनायकांपैकी वरदविनायकाची हि मूर्ती १६९० साली धोंडू पौढकर यांना या ठिकाणच्या तलावात सापडली होती. नंतर पेशवे काळात १७२५ साली कल्याणचे सुभेदार असलेल्या रामजी महादेव भिवळकरांनी वरदविनायकाचे मंदिर बांधून महड गावही वसवले. पौढकरांना सापडलेल्या मूर्तीची अवस्था अतिशय वाईट होती म्हणून मंदिराच्या संयोजकांनी त्या मूर्तीचे विसर्जन करून त्याठिकाणी दुसरी नवीन मूर्तीची बसवली. समाजातील काही जणांनी या कृतिवर हरकत असलेली केस कोर्टात दाखल केली.
म्हणून येथे आपल्याला गाभाऱ्याच्या बाहेर एक आणि दुसरी गाभाऱ्याच्या आत अश्या गणपतीच्या दोन मूर्त्या दिसतात. यातील एक मूर्ती डाव्या सोंडेची असून ती शेंदुराच्या लेपाने माखलेली आहे तसेच दुसरी मूर्ती उजव्या सोंडेची असून ती पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडाची आहे. मंदिरात दगडी महिरप आहे. मंदिरातील गणेशाची मूर्ती डाव्या सोंडेची असून सिंहासनावर आरूढ आहे. रिद्धी आणि सिद्धी यांच्या मूर्त्यासुद्धा मंदिरात आहेत.
कौलारूचे असलेले वरदविनायकाचे मंदिर अतिशय सुंदर असून मंदिराला सुंदर घुमट आहे. घुमटावर सोनेरी कळस असून कळसावर नागदेवतेची नक्षी आहे.
या मंदिराच्या चारही बाजूंनी चार हत्तीची शिल्पे आहेत. १८९२ वर्षांपासून पासून या मंदिरात अखंड दिवा(नंदादीप) जळत आहे. वरदविनायकाचे मंदिर प्रसिद्ध असून येथे येणाऱ्या भक्तांना रोज दुपारी १२ ते २ पर्यंत महाप्रसाद दिला जातो.
अष्टविनायकांतील हे एकमेव मंदिर आहे जिथे भक्तांना दर्शनासाठी थेट गाभाऱ्यात प्रवेश करण्याची परवानगी आहे. वरदविनायक मंदिरात भगवान गणेशाच्या दर्शनासाठी जगभरातून लोक येतात. मंदिराचा सभामंडप ८० फुट रुंद तसेच ८० फुट लांब आहे.
वरदविनायकाची पूजा आणि साजरे केले जाणारे सण
नवसाला पावणारा असेही या गणपतीला ओळखले जाते. मंदिरात येणारे सर्व भाविक दुपारी १२ वाजेपर्यंत स्वतः गणरायाची पूजा आरती करू शकतात.
या मंदिरात दोन मुख्य उत्सव साजरे केले जातात जसे भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी आणि माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी. ह्या उत्सवात सर्व भक्त आपल्या इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करतात. तसेच अंगारकी आणि संकष्टी चतुर्थीलासुद्धा येथे नेहमीच उत्सव साजरा केला जातो.
वरदविनायक महाडला कसे पोहचाल?
रोडने –
पुण्याहून पुणे-मुंबई एस. टी. बसने खोपोली येथे जाऊन तेथून दुसऱ्या एस. टी. बसने किंवा सहा सीटर रिक्षाने ‘महड’ येथे जात येते. पुणे येथील शिवाजीनगर किंवा स्वारगेट एस. टी. बस स्थानकातून खोपोलीकडे जाणाऱ्या अनेक एस. टी. बसेस् सुटतात.स्वतःच्या वाहनानेही आपण या ठिकाणी पोहोचू शकतो.
रेल्वेने
सर्व पर्यटन स्थळासाठी मुंबई सी.एस.टी. टर्मिनस, एल.टी.टी., कुर्ला टर्मिनस, पुणे रेल्वे स्टेशन आणि पनवेल रेल्वे स्टेशन (रायगड जिल्ह्यात) भारतीय रेल्वेच्या मुख्य मार्गांसाठी सर्वात जवळची रेल्वे स्थानके आहेत. रायगड जिल्ह्यातील कोकण रेल्वेचे जवळचे रेल्वे स्थानक पेन्, रोहा, वीर इत्यादी आहेत. पनवेल जंक्शन जिल्ह्यातील सर्वात महत्वाचे रेल्वे स्टेशन आहे. ते मुंबईला (हार्बर मार्ग आणि मध्य रेल्वेचे मुख्य मार्ग), ठाणे (ट्रान्स हार्बर लाइन), रोहा, वसई (पश्चिम रेल्वे) याद्वारे जोडलेले आहे. नेरळहून माथेरान पर्यंत एक “नेरो गेज” रेल्वे मार्ग आहे, याला माथेरान हिल रेल्वे असे म्हणतात.
विमानाने
जवळचे विमानतळ लोहेगाव विमानतळ, पुणे आणि छत्रपती शिवाजी विमानतळ, मुंबई, महाराष्ट्र ही आहेत.