विघ्नेश्वर ओझर गणपती | विघ्नहर | Vigneshwara Temple, Ozar (vighnahar)
ओझर येथील विघ्नेश्वर मंदिर पुण्यापासून सुमारे ८५ किलोमीटर अंतरावर आहे. अष्टविनायकापैकी ओझरचा विघ्नेश्वर हा अनुक्रमे सातवा गणपती आहे. सर्व अष्टविनायक गणपती मंदिरांमधील श्रीमंत गणपती मंदिर म्हणूनही श्री विघ्नहराला ओळखले जाते. प्रसन्न व मंगलमूर्ती असलेला श्री गणेश भक्तांवर आलेल्या विघ्नांचे हरण करतो म्हणून याला विघ्नहर म्हणतात.
विघ्नेश्वर मंदिर, ओझर कथा
पुराणानुसार अभिनंदन राजाने त्रिलोकानाथ होण्यासाठी म्हणजेच इंद्रपद मिळविण्यासाठी यज्ञ सूरू केला. आपले इंद्रपद जाईल या भीतीने संतप्त होऊन इंद्रदेवाने विघ्नासूर नावाच्या दानवाची उत्पत्ती करून त्याला यज्ञात विघ्न आणण्यास पाठवले. विघ्नासुराने यज्ञस्थळी जाऊन यज्ञामध्ये विघ्न आणले आणि सृष्टीमध्ये खूप विध्वंस निर्माण केला. त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरुवात केली. यामळे मग पृथ्वीतळावरील ऋषीमूनी आणि लोक ब्रम्हदेव आणि शंकर यांच्याकडे जाऊन विघ्नासुराने केलेल्या विध्वंसाची कथा सांगतात. दोन्ही देवांनी ऋषीमूनींना गणपतीला शरण जाण्यास सांगितले. सर्वांनी गणरायाची अराधाना करून त्यांना प्रसन्न केले. पराशर ऋषींचा पुत्र म्हणून गणपतीने जन्म घेऊन विघ्नासूराचा पराभव केला. विघ्नासूर गणरायाला शरण गेला आणि त्याने गणपतीला विनंती करून तुमच्या नावाआधी माझे नाव भक्तांनी घ्यावे तसेच तुम्ही यास्थळीच कायमचे वास्तव्य करावे. विघ्नासूराची विनंती गणपतीने मान्य करून तो या ठिकाणी वास्तव्य करू लागला. यामुळे सर्वजण आनंदित झाले आणि त्यांनी इथे विघ्नेश्वराची स्थापना केली.
विघ्नेश्वर मंदिर, ओझर आणि परिसर
विघ्नेश्वर मंदिराच्या प्रमुख प्रवेशद्वारावर चार द्वारपाल आहेत आणि पहिल्या आणि चौथ्या द्वारपालाच्या हातात शिवलिंग आहे. तसेच हे मुख्य प्रवेशद्वार हे पूर्व दिशेला आहे. विघ्नेश्वर गणेशांची स्वयंभू मूर्ती आहे. येथील पूर्वाभिमुख मूर्तीच्या कपाळावर नाभीवर हिरे आहेत तसेच गणपतीची सोंड डावीकडे अवळलेली आहे. नेहमीप्रमाणे गणपतीच्या आजूबाजूला रिद्धी आणि सिद्धी यांच्या मुर्त्या आहेत. गणपतीच्या मुर्तीच्यावर शेषनाग आणि वास्तुपुरुष यांच्या प्रतिमा आहेत. मंदिराचे शिखर आणि कळस सोनेरी आहेत. मंदिराच्या आतील परिसर मोठा असून स्वच्छ आणि सुंदर आहे. मंदिराच्या अंगणात दोन सुंदर दीपमाळा आहेत. मंदिराच्या चारही बाजूंना दगडी भिंतीची तटबंदी आहे. मंदिरात लहान आकाराच्या खोल्या आहेत, यांना ओवऱ्या म्हणतात. या ओवऱ्यात बसून येणारे भक्त ध्यान करू शकतात.
विघ्नेश्वर गणपती मंदिरासमोर २० फुट लांब सभामंडप असून मंदिराच्या आतील गाभारा १० बाय १० फुटाचा आहे. विघ्नेश्वर गणपतीचे हे मंदिर कुकडी नदीच्या तीरावर वसलेले असून जागृत क्षेत्र आहे. या मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे.
विघ्नेश्वराची पूजा आणि येथे साजरे होणारे उत्सव
विघ्नेश्वर गणपतीच्या दर्शनाची वेळ सकाळी ५ ते रात्री ११. आहे तसेच हीच वेळ अंगारकी चतुर्थीला मोठ्या सकाळी ४ वाजेपासून रात्री ११ वाजेपर्यंत केली जाते. महाआरती सकाळी ७.३० वाजता, मध्यान्न आरती दुपारी १२ वाजताआणि शेजआरती रात्री १० वाजता होत असते. महाप्रसादाची वेळ सकाळी १०, दुपारी १ आणि संध्याकाळी ७.३० ते १०.३० वाजेपर्यंत असते.
भाद्रपदमध्ये गणेश जयंतीला येथे चार दिवस उत्सव मोठया आनंदाने साजरा केला जातो. गणेशोत्सव आणि संकष्टी चतुर्थीला भक्तांची येथे दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी होते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवसात केलेली सजावट आणि दीपमाळांची रोषणाई नेत्रदीपक असते.
विघ्नेश्वर मंदिर, ओझर येथे कसे जायचे?
रेल्वेने:
रेल्वेने ओझरच्या विघ्नेश्वर गणपती मंदिरापर्यंत जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन शिवाजीनगर हे आहे. शिवाजीनगर रेल्वे स्थानकापासून विघ्नेश्वर मंदिर सुमारे ८८ किलोमीटर अंतरावर आहे.
रसत्याने:
पुणे-नाशिक महामार्गावरून जुन्नर पासून ओझर हे अंतर ८ किलोमीटर आहे. स्वतःच्या खासगी वाहनाने(दुचाकी किंवा चारचाकी) किंवा आपण महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी बसनेही मंदिरापर्यंत पोहचू शकतो.
विमानाने:
विमानाने ओझर गणपती मंदिरात जायचे असेल तर पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सर्वात जवळचे विमानतळ आहे. या विमानतळापासून विघ्नेश्वर, ओझर गणपती मंदिर सुमारे ८६ किलोमीटर अंतरावर आहे.
आसपासची इतर पर्यटन स्थळे-
आर्वी – उपग्रह केंद्र. अंतर अंदाजे १३ किमी
भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग- अंतर अंदाजे ७८ किमी
खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी आकाश दुर्बीण- अंतर अंदाजे २१ किमी
संत ज्ञानेश्वर यांनी ज्या रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेतले त्या रेड्याचे समाधीस्थळ आळे – अंतर अंदाजे २७ किमी