रांजणगाव महागणपती मंदिर | Mahaganpati Ranjangaon Temple
महागणपती (रांजणगाव) हे पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकांपैकी एका गणपतीचे मंदिर आहे. पुणे-अहमदनगर महामार्गावर पुण्यापासून ५२ किलोमीटर अंतरावर रांजणगाव येथे श्री महागणपती मंदीर आहे. अष्टविनायकातील आठवा गणपती म्हणून रांजणगावचा महागणपती ओळखला जातो.
श्री महागणपती मंदिर आणि मंदिरचा परिसर
श्री महागणपती, रांजणगाव हे मंदिर पूर्वाभिमुख असून, मंदिर मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूला आहे. या मंदिराला भव्य आणि सुंदर असे प्रवेशद्वार आहे. मंदिराची बांधणी मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण केली असून दक्षिणायन आणि उत्तरायण यांचा मध्य काळात सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात. अशा वेळी शेंदूर लावलेली महागणपतीची मूर्ती अधिकच आकर्षक दिसते. मूळ मूर्तीचे नाव “महोत्कट’ असून, या मूर्तीला दहा सोंडा व वीस हात आहेत, ही मूर्ती तळघरात ठेवलेली आहेत. सभामंडपातून आत गेल्यावर गाभाऱ्यात गणेशाची डाव्या सोंडेची कमळावर आसन घातलेली रेखीव मूर्ती आहे. येथील पूजेकरिता ठेवलेल्या गणपतीच्या मूर्तीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला रिद्धी सिद्धी आहेत. श्री महागणपती हा भक्तांच्या नवसाला हमखास पावतो अशी भक्तांची श्रद्धा आहे.
पूर्वाभिमुखी असलेले हे मंदिर अगदी साधे होते पण आता बरेच बदल झाले असून मंदिरात आधुनिक सोयींसुविधा करण्यात आल्या आहेत. मंदिराच्या आवारातील परिसराचे नव्याने सुशोभीकरण करण्यात आले आहे. या मंदिराचा सभामंडप सरदार किबे यांनी बांधला होता तर सध्या असलेले महागणपतीचे मंदिर हे पेशवेंनी बांधले आहे.
श्री क्षेत्र महागणपतीची कथा
पुराणानुसार, ऋषी ग्रीत्समद यांचा मुलगा त्रिपुरासुर हा अति चतुर आणि बुद्धिमान बालक होता. त्रिपुरासुर गणपतीचा अनन्य भक्त होता त्याने तपस्या करून गणपतीला प्रसन्न केले होते. गणपतीने प्रसन्न होऊन त्रिपुराला वरदान दिले होते कि त्याला फक्त महादेव शंकरच संपवू शकत होते. त्यामुळे अहंकाराने उन्मत्त झालेल्या त्रिपुरासुराने सर्व देवनांना त्रास देण्यास सुरुवात केली. ब्रम्हदेव आणि विष्णू यांच्यासहीत सर्व देव त्याच्या त्रासाला कंटाळून हिमालयात लपून बसले. तेंव्हा या सर्व देवांना नारद मुनींनी गणपतीची मदत घेण्याचा सल्ला दिला. गणपतीने सर्व देवांच्या विनंतीस मन देऊन त्यांची मदत करण्यास मान्य केले.
गणपतीने तेजस्वी ब्राम्हणाचे रूप धारण केले आणि मला चौसष्ट कला येतात, त्या दाखवण्यासाठी आलो आहे, असे सांगितले. ब्राह्मणाने त्रिपुरासुराला तीन उडणारी विमाने बनवून देण्याची सबब दिली. त्याला सांगितले, “या विमानातून तू कुठेही जाऊ शकशील, मात्र महादेवांनी बाण मारल्यास तुझा विनाश होईल. तसेच त्रिपुरासुराला कैलाश पर्वतावरून चिंतामणीची मूर्ती आणण्यास सांगितली. अतिलोभाने आंधळ्या झालेल्या त्रिपुरासुराने कैलासावर आक्रमण केले. शंकर स्वतः त्याला हरवू शकत नसल्यामुळे त्यांनी गणेशाचे आवाहन केले. तेथे गणपती प्रकट झाल्यावर गणेशाने महादेवाला त्रिपुरासुराला संपवण्याचे सांगितले. गणपतीचे म्हणणे ऐकून महादेवांनी “प्रणम्य शिरसा देवम्’ या श्लोकाचे स्मरण करून, एका बाणात त्रिपुरासुराचा वध केला. आणि त्या जागी महागणपतीचे मंदिर बांधले.
ही घटना कार्तिक शुद्ध पौर्णिमेला घडली म्हणून या दिवसाला “त्रिपुरी पौर्णिमा’ असे म्हटले जाते. शंकराने ज्या ठिकाणी गणेशाचे स्मरण केले होते ते गाव म्हणजे मणिपूर गाव होय. तिथे महादेवांनी गजाननाची स्थापना केली आणि आज तेच गाव रांजणगाव म्हणून ओळखले जाते.
महागणपती पूजा आणि येथे साजरे होणारे उत्सव
गणेश चतुर्थी सारखे सर्व सण येथे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. या दिवसांमध्ये मंदिर वेगवेगळे फुले, दिवे आणि इतर सजावटींनी सुशोभित केले जाते. या उत्सवादरम्यान महाराष्ट्र आणि भारतातील इतर भागांतील लोक भगवान गणेशाची पूजा करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात येतात. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा पासून भाद्रपद शुद्ध पंचमी या पाचही दिवसांत येथे दर्शनासाठी येणाऱ्या सर्व गणेशाच्या भक्तांना मंदिराच्या गाभाऱ्यात मूर्तीपर्यंत जाऊन दर्शन घेण्याची परवानगी असते.
श्री महागणपती मंदिर रांजणगाव येथे कसे जाल?
रस्त्याने: रांजणगाव पुण्यापासून ५१ किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदीर पुणे-अहमदनगर महामार्गावर असल्यामुळे येथे जायला भरपूर एसटी बसेस, रिक्षा आणि कॅब उपलब्ध असून आपण खासगी वाहनानेही जाऊ शकतो. महागणपती मंदिर वर्षभर पर्यटकांसाठी खुले असते.
रेल्वेने: सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन पुणे रेल्वे स्टेशन आहे, जे रांजणगाव पासून ५० किमी अंतरावर आहे.
विमानाने: श्री महागणपती मंदिर, रांजणगावपासून सर्वात जवळचे विमानतळ पुणे येथील विमानतळ आहे, रांजणगाव पासून ५३ किमी अंतरावर आहे.
जवळची इतर दर्शनीय स्थळे
येथून २७ किलोमीटर अंतरावर वडू बुद्रुक येथे संभाजी महाराजांची समाधी आहे.
तसेच २७ किलोमीटर अंतरावर निघोज येथे कुकडी नदीच्या पात्रात खडकांमध्ये रांजणाच्या आकाराचे नैसर्गिक खळगे आहे.