गिरिजात्मज लेण्याद्री गणपती | Lenyadri Girijatmaj Ganpati Temple
गिरिजाचा म्हणजेच पार्वतीचा आणि आत्मज म्हणजे पुत्र असा हा गिरिजात्मज आहे. गिरिजात्मज लेण्याद्री गणपती मंदिर हे अष्टविनायक मंदिर तीर्थक्षेत्रात भेट दिले जाणारे अनुक्रमे सहावे मंदिर आहे.अष्टविनायकातिल गिरिजात्मज मंदिर हे अष्टविनायकाचे एकमेव मंदिर आहे जे डोंगरावर वसलेले आहे. हे मंदिर बौद्ध गुहेच्या परिसरात उभारले आहे. तसेच २८ लेण्यांपैकी सातव्या क्रमांकाच्या लेणीमध्ये मंदिर आहे या लेण्यांना गणेश गुफा असेही म्हणतात. गिरिजा हे देवी पार्वतीचे दुसरे नाव आहे आणि ‘आतमज’ म्हणजे ‘पुत्र’.
गिरिजात्मज मंदिर, लेण्याद्री कथा
गिरिजात्मज नाव असलेल्या लेण्याद्रीच्या गणपतीच्या जन्माच्या वेगवेगळ्या कथा ऐकायला मिळतात. गणेश पुराण कथेनुसार, देवी सती पार्वतीच्या रूपात(पुनर्जन्मात) असताना पुत्रप्राप्तीसाठी लेण्याद्री पर्वतावर कठोर तपश्चर्या केली. भाद्रपद शुद्ध किंवा चतुर्थीच्या चौथ्या दिवशी, पार्वतीने आपले शरीर पुसून स्वतःच्या अंगाच्या मळापासून एक मूर्ती बनवली. पार्वतीने मळाने तयार केलेल्या या मूर्तीमध्ये गणपतीने प्रवेश केला. पार्वतीसमोर सहा हात आणि तीन डोळे असलेला एक बालक प्रगट झाला आणि त्याचे नाव गिरिजात्मज होते. गणपती गिरिजात्मज अवतारामध्ये लेण्याद्री येथे जवळपास 15 वर्षे वास्तव्यास होते या काळात गणेशाने अनेक दानवांचा वध केला.
लेण्याद्रीचा गिरिजात्मज पुण्यापासून सुमारे १०१ किलोमीटर अंतरावर आहे तसेच जुन्नर पासून ७ किलोमीटर आहे. जुन्नर तालुक्याच्या उत्तरेला हतकेश्वर आणि सुलेमानच्या डोंगररांगांमध्ये असलेल्या लेण्यात गणपतीची मूर्ती असल्याने त्या सर्वच लेण्यांना ‘गणेश लेणी’ असेही म्हणतात. ‘लेण्यांद्री’ पर्वत गोळेगाव या गावाच्या हद्दीमध्ये येतो तसेच जवळूनच कुकडी नदीचा प्रवाह आहे. लेण्यांद्रीचा उल्लेख ‘लेखन पर्वत’ तसेच ‘जीर्णापूर’ असाही असल्याचे आढळते. गिरिजात्मजाचे मंदिर सुमारे १७०० वर्षे जुने आहे. हे मंदिर साधे आहे तसेच संपूर्ण मंदिर एका अखंड पाषाणामध्ये कोरून बनवले आहे. आपल्याला मूर्तीपर्यंत पोहचण्यासाठी सुमारे २८०-२९० पायऱ्या चढून वर जावे लागते. या मंदिरात आपल्याला एकही इलेक्ट्रिक बल्ब दिसत नाही करण मंदीर असे वैशिष्ट्यपूर्ण बांधले आहे की सूर्य आकाशात असेपर्यंत मंदिरात सूर्यप्रकाश असतो. गणपतीची ही स्वयंभू मूर्ती प्रकट झालेली आहे. या मूर्तीची सोंड डावीकडे वळलेली आहे. गिरिजात्मजाची मूर्ती ही उत्तराभिमुख आहे तसेच मंदिर दक्षिणाभिमुख आहे. मूर्तीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला महादेव आणि हनुमानाच्या मुर्त्या आहेत. गणेशाच्या मूर्तीच्या नाभीत आणि कपाळावर हिरे बसविलेले आहेत. गणपतीच्या मूर्तीला प्रदक्षिणा घालणे शक्य नाही कारण मूर्तीच्या मागचा संपूर्ण भाग कोरीव असून डोंगराने व्यापला आहे. लेन्याद्रीच्या सर्व लेण्या(गुहा) पांडवांनी त्यांच्या वनवास काळात बनवल्या होत्या असा मानस आहे.
मुख्य मंदिरासमोर बौद्ध भिक्खूंसाठी साठी रेखीव, भव्य असा ५१ फूट रुंद व ५७ फूट लांब सभामंडप आहे आणि त्याला १८ लहान खोल्या आहेत. यात्रेकरू या मंडपात बसून ध्यान करतात. विशेष म्हणजे या सभामंडपाला कोठेही खांबाचा आधार नाही. सभामंडपाच्या समोरील बाजूस रेखीव खांब आहेत. तसेच या लेण्यांच्या समूहात ६ शिलालेख, २ चैत्यगृहे, पाण्याची १५ कुंडे आहेत.
गिरिजात्मजाची पूजा आणि साजरे होणारे उत्सव
गिरिजात्मज गणेशाच्या दर्शनाची वेळ सकाळी ६ ते संध्याकाळी ६ पर्यंत आहे. अतिशय महत्वाची असलेली पंचामृत पूजा मंदिरात दररोज सकाळी केली जाते.
गणेश चतुर्थी सारखे सण येथे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. तसेच उत्सवादरम्यान मंदिराला फुले आणि दिव्यांनी सुशोभित केले जाते. या उत्सवात बैलगाडा शर्यत हा लोकप्रिय खेळ आयोजित केला जातो. गणेश जयंतीचा उत्सव माघ प्रतिपदा ते माघ षष्टी पर्यंत साजरा केला जातो. या दिवसांत मंदिरात अखंड हरीनाम साप्ताहाचे आयोजन केले जाते.
महाराष्ट्रातील तसेच भारतातील विविध भागांमधून भक्तगण गणेशाची पूजा करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी गिरिजात्मज गणपती मंदिराला भेट देतात.
गिरिजात्मज मंदिर, लेण्याद्री येथे कसे जायचे?
पुणे येथील शिवाजीनगर बस स्थानकावरून महामंडळाच्या एसटी बसेस सतत सुरु असतात तसेच आपण आपल्या खासगी वाहनानेही जाऊ शकतो.
पुण्यावरून जाताना नाशिक फाटा-भोसरी-चाकण-राजगुरुनगर-मंचरनारायणगांव-जुन्नर यामार्गे १०१ किलोमीटर असून २.३० तासांच्या अंतरावर आहे.
आसपासची इतर पर्यटन स्थळे-
- गिरिजात्मज मंदिर, लेण्याद्री येथून ६ किलोमीटर अंतरावर छत्रपती शिवाजीमहाराज यांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला आहे.
- जवळच ८.५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कुकडी नदीच्या उगमस्थानाजवळ कुकडेश्वर मंदिर आहे.
- तसेच १७ किलोमीटर अंतरावर ओतूर येथे त तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्यस्वामी यांची समाधी आणि प्राचीन काळातील कपर्दिकेश्वर मंदिर आहे.
- २८ किलोमीटर अंतरावर माळशेज घाटातील अभयारण्य.
- ३३.५ किलोमीटर अंतरावर नाणेघाट(ऐतिहासिक स्थळ).