थेऊर येथील चिंतामणी मंदिर | Chintamani Ganpati Temple, Theur
चिंतामणी गणपती मंदिर, थेऊर हे अष्टविनायकच्या यात्रेतील अनुक्रमे पाचवे स्थान आहे. पुण्यापासून २७ किलोमीटर अंतरावर हवेली तालुक्यात चिंतामणी मंदिर आहे. अष्टविनायक गणपती मधील सर्वात भव्य म्हणून श्री चिंतामणी मंदिर प्रसिद्ध आहे. मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची आहे. चिंतामणीची मूर्ती पूर्वाभिमुख आसनारुढ आहे. हे मंदिर भीमा नदी आणि मुळा आणि मुठा नद्यांच्या संगमावर आहे.
श्री क्षेत्र चिंतामणीची कथा
पुराणानुसार प्राचीन काली अभिजित राजा आणि त्याच्या पत्नीने कडक तपस्या करून गणासूरला जन्म दिला. गणासूर ऋषी कपिला यांच्या आश्रमात गेला असता ऋषींनी त्यांच्या जवळचा चिंतामणी रत्न वापरून गणासूराला सर्वोत्तम पंचपक्वान्नांचे जेवण जेऊ घातले. गणासूरने चिंतामणी रत्न बघितल्यावर त्याला या दिव्या रत्नाचा लोभ सुटला आणि त्याने ऋषींना रत्न आपल्याला देण्याची मागणी केली. मात्र कपिला ऋषींनी गणासूरला रत्न देण्यास नकार दिला. तरीही गणासूरने ऋषींकडून ते रत्न जबरदस्तीने हिसकावून घेतले. कपिला ऋषी हतबल झाले असता दुर्गा देवीने त्यांना गणपतीचा धावा करण्याचा सल्ला दिला.
गणपतीने गणासूरला कदंबवृक्षाखाली युद्धामध्ये पराभूत करून त्याच्याकडून ते चिंतामणी रत्न घेऊन पुन्हा कपिला ऋषींना दिला. याचे बक्षीस म्हणून ऋषींनी ते चिंतामणी रत्न गणरायाच्या गळ्यात घातले. या घटनेनंतर गळ्यात चिंतामणी रत्न घातलेला गणपती चिंतामणी म्हणून ओळखला जाऊ लागला. तसेच ही सर्व कथा कदंबवृक्षाखाली घडल्यामुळे थेऊरला ‘कदंबपूर’ असेसुद्धा संबोधले जाते.
श्री चिंतामणी मंदिर आणि परिसर
चिंतामणी गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे आणि पूर्वाभिमुख आहे. तिची सोंड डावीकडे वळलेली आहे आणि मूर्तीचे दोन्ही डोळे लाल मणी आणि मौल्यवान हिऱ्यांनी जडीत आहेत. देवळाचे महाद्वार किंवा मुख्यद्वार हे उत्तरेकडे आहे आणि मुळा-मुठा नदीच्या मार्गाला जोडते. मंदिराच्या संकुलाच्या आंत एक छोटे शिवमंदिर आहे. हे मंदिर बांधताना दगडचा आणि लाकडाचाही वापर केला असून मंदिर आजही मजबूत स्थितीत उभे आहे. मंदिराच्या परिसरात युरोपीयांकडून पेशव्यांना मिळालेली पितळीची मोठी घंटा बसवली आहे.
भीमा, मुळा आणि मुठा या तीन प्रमुख प्रादेशिक नद्यांच्या संगमावर थेऊर हे एक महत्त्वाचे पौराणिक ठिकाण आहे. चिंतामणी गणेशाच्या रूपात भगवान गणेश हा मनःशांती आणणारा आणि मनातील सर्व गोंधळ दूर करणारा देव आहे. मुळा-मुठा नदींने वेढलेले हे श्री क्षेत्र थेऊर पुणे-सोलापूर रेल्वेमार्गावर पुण्यापासून २५ कि.मी. अंतरावर असलेल्या लोणी गावापासून फक्त सात कि.मी.वर आहे.
चिंतामणी गणपती मंदिर थेऊरचा इतिहास
ऐतिहासिक नोंदींनुसार थेऊरचे चिंतामणी गणपती मंदिर कधी बांधले गेले आणि त्याचे बांधकाम करणारा कोण होता याचा कोणताही पुरावा नाही. परंतु हे मंदिर युगानुयुगे अस्तित्वात असल्याचे मानले जाते. आज आपण पाहत असलेली मुख्य मंदिराची रचना मोरया गोसावी यांच्या वंशजांनी बांधली होती.
शंभर वर्षांच्या बांधकामानंतर माधवराव पेशवे यांनी सभा मंडप बांधला. त्यांनी येथे एक मोठी घंटाही बसवली. थोरले माधवराव पेशवे यांची श्री चिंतामणी गणपतीवर खूप श्रद्धा होती ते या मंदिरात नेहमी दर्शनाला येत असत. माधवराव पेशवेंना वयाच्या २७ व्या वर्षीच क्षयरोग झाला आणि या मंदिरात गणपतीसमोरच त्यांची प्राणज्योत मालवली होती. पेशवे माधवराव आणि रमाबाई यांच्या निधनानंतर या जागेवर उद्यान विकसित करण्यात आले.
श्री चिंतामणी थेऊरच येथे कसे पोहचाल?
पुण्यापासून श्री चिंतामणी गणपती मंदिर, थेऊर २७ किलोमीटर अंतरावर असून येथे जाण्यासाठी हडपसर येथून दर तासाला पी. एम. पी. एम. एल. ही शहरी बससेवा उपलब्ध आहे. तसेच येथे जायला भरपूर एसटी बसेस, रिक्षा आणि कॅब उपलब्ध असून आपण खासगी वाहनानेही जाऊ शकतो.