पहिला गणपती – मोरेश्वर (मयुरेश्वर), मोरगांव | Moreshwar Temple, Morgaon
मोरगाव मंदिर हे 11 व्या शतकातील असून अष्टविनायक मंदिरांपैकी सर्वात प्राचीन मंदिर आहे. पुणे ते मोरेश्वर हे अंतर ६८ किलोमीटर आहे तसेच येथे जाण्यासाठी चांगल्या रस्ते आहेत. अष्टविनायक यात्रेला सर्वप्रथम मोरेश्वर मंदिरापासूनच सुरुवात होते. मंदिरातील गणपतीची मूर्ती स्वयंभू मानली जाते, याचा अर्थ ही मूर्ती कोणीही बनवली नसून स्वयं प्रगत झाल्याचे मानले जाते. ही मूर्ती काळ्या पाषाणाची असून सुमारे 3 फूट उंच आहे.
मोरेश्वर मंदिर आणि परिसर
अष्टविनायकातील सर्वांत पहिला क्रमांकाचा गणपती म्हणून मोरगावचा मोरेश्वर ओळखला जातो. मोरेश्वराचे मंदिर म्हणजे जणू भव्य गढीच दिसते. या मंदिराच बांधकाम आदिलशाही कालखंडात पिलाजी गोळे यांचे आजोबा सुभेदार गोळे यांनी केले आहे. मंदिराच्या बांधकामासाठी काळ्याभोर दगडाचा वापर करण्यात आला आहे.
मंदिर मोरगावाच्या मधोमध वसले असून याला चहू बाजूंनी मनोरे आहेत. मंदिराला संरक्षणासाठी ५० फूट उंच संरक्षण भिंत आहे. मुघल साम्राज्याच्या काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या मंदिराला मशिदीसारखा आकार दिलेला आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातील गणपतीची मूर्ती बसलेल्या स्थितीत आहे. डाव्या सोंडेची असलेली मोरेश्वराची मूर्ती पूर्वाभिमुख असून अत्यंत आकर्षक दिसते. गणपतीच्या डोळ्यात आणि नाभीत हिरे जडवले आहे. मोरेश्वराच्या शिरावर नागदेवतेचा फणा आहे. गणपतीच्या उजव्या आणि डाव्या बाजूने रिद्धी आणि सिद्धी यांच्या पितळीच्या प्रतिमा आहेत. तसेच मूर्तीच्या समोर उंदीर व मोर आहेत.
मंदिराला चारही दिशांनी गणपतीची प्रतिमा असलेले चार प्रवेशद्वारे आहेत, मुख्य प्रवेशद्वार हे उत्तराभिमुख आहे. मंदिराच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर चारही युगातील म्हणजेच सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग यातील गणपतीच्या अवताराचे चित्र आहे. मंदिराच्या अंगणात दोन भव्य दीपमाळा म्हणजेच दिव्याचे बुरुज आहेत.
मोरेश्वर मंदिराची कथा
पौराणिक कथेनुसार, पूर्वीच्या काळी सिंधू नावाच्या राक्षसाने पृथ्वीवर भयंकर उत्पात माजवला होता. याच राक्षासाचा वध करण्यासाठी सर्व देवतांनी हतबल होऊन गणपतीची आराधना केली. गणपतीने मोरावर आरूढ होऊन येथे सिंधू नामक राक्षसाचा वध केला म्हणून गणपतीला येथे मयूरेश्वर असे नाव पडले. या गावामधे मोरांची संख्या खूप जास्त असल्यामुळे या गावाला मोरगाव असे म्हटले जाते.
असे म्हटले जाते की ब्रम्हदेवाने दोनदा या मोरेश्वराची मूर्ती बनवली आहे. पहिली बनवलेली गणपतीची मूर्ती सिंधुसुराने भंग (तोडली) केली होती. त्यानंतर ब्रम्हदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली.
सध्या असलेली मयूरेश्वराची मूर्ती खरी नसून त्यामूर्ती मागे खरी मूर्ती आहे असे मानले जाते. ती मूर्ती सूक्ष्म वाळू व लोखंडाचे कण व हिऱ्यांपासून बनलेली आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिरात गणपतीकडे तोंड करून बसलेल्या विशालकाय नंदीचे शिल्प आहे व जवळपास ६ फूट उंचीचा एक उंदीर आहे. असे सांगितले जाते की महादेवाच्या मंदिरासाठी हि नंदीची मूर्ती रथातून नेली जात असताना येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले. म्हणून या नंदीला याच मंदिरात ठेवण्यात आले.
मोरेश्वराची पूजा आणि साजरे केले जाणारे सण
रोज सकाळी 7 वा., दुपारी 12 वा.आणि रात्री 8 वा. अशी दिवसातून तीन वेळा गणपतीची पूजा-आरती केली जाते. गणेश जयंती आणि गणेश चतुर्थी तेथे मोठी गर्दी असते. गणेश चतुर्थीचा मुहूर्त जवळपास महिनाभर सुरु असतो. विजया दशमी, सोमवती अमावस्या शुक्ल चतुर्थी, कृष्ण चतुर्थी असे सर्व उत्सव अत्यंत आनंदाने जत्रांचे आयोजन करून साजरे केले जातात.
मोरगाव मंदिर हे एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र आहे आणि दरवर्षी लाखो लोक या मंदिराला भेट देतात. मंदिरात दररोज दर्शनासाठी खूप गर्दी असते.
मोरेश्वर (मोरगावला) कसे जाल?
रोडने –
मोरगाव हे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांना चांगल्या रस्त्यांन्नी जोडलेले आहे.
खाजगी किंवा एसटी बस ने आपण मोरगावला जाऊ शकतो. पुण्यापासून मोरगाव सुमारे ६६ किलोमीटर अंतरावर असून तेथे पोहचायलाअंदाजे २ ते २. १५ तास वेळ लागतो. मंदिर परिसरात आपल्याला जेवणाची अनेक हॉटेल आहेत तसेच राहण्याची सोय उत्तम आहे.
रेल्वेने –
पुणे रेल्वे स्टेशन वरून आपण जेजुरीला जाऊन तिथून रिक्षा किंवा बसने मोरगावला जाऊ शकतो. पुणे स्थानकावरून जेजुरीला बऱ्याच रेल्वे उपलब्ध आहेत. पुणे ते जेजुरी हे अंतर रेल्वेने फक्त ५७ कि.मी. वर आहे आणि जेजुरीहून मोरगाव १७ किलोमीटर.